
बोरघाट महामार्गावर पार्क केलेल्या कारला धडकलेली वेगवान दुचाकी
बातमी थोडक्यात
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाट येथे पार्क केलेल्या कारला वेगात आलेल्या स्पोर्ट्स बाईकची धडक लागली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी शिंग्रोबा मंदिराच्या खाली वळणावर ही घटना घडली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी महामार्ग पोलीस व हेल्प फाउंडेशन तातडीने दाखल झाले. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाट मार्गे अनेक स्पोर्ट्स बाईकस्वार अति वेगाने जाताना दिसतात. त्यामुळे वळणे, अरुंद रस्ते, वाहतूक यामुळे इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार व रविवारच्या दिवशी गस्त वाढवावी, वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.